वर्ल्डकप १९९० मध्ये अर्जेंटिनाविरुद्ध झालेल्या सामन्यात एकमेव गोल करत वेस्ट जर्मनीला चॅम्पियन बनवणाऱ्या एंड्रीयास ब्रेहमे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
त्यांची पार्टनर सुजेन शेफर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत त्यांच्या निधनाची बातमी सांगितली आहे. शेफर यांनी म्हटले की, ' एंड्रीयास ब्रेहमे यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.'
एंड्रीयास ब्रेहमे हे फुटबॉल विश्वात गाजलेलं नाव आहे. एंड्रीयास ब्रेहमे यांनी १९९० वर्ल्डकप स्पर्धेतील सेमीफायनलमध्येही इंग्लंडविरुद्ध खेळताना गोल केला होता. हा सामना वेस्ट जर्मनीने पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवला होता. त्यानंतर फायनलमध्ये वेस्ट जर्मनी आणि अर्जेंटीना हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यातील ८५ व्या मिनिटाला गोल करत एंड्रीयास ब्रेहमे यांनी जर्मनीला चॅम्पियन बनवलं होतं.
त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी यूनिफाईड जर्मनी आणि वेस्ट जर्मनीसाठी ८६ सामने खेळले. क्लब लेव्हल खेळताना त्यांनी २ वेळेस जर्मन पुरस्कार जिंकला होता. १९८७ मध्ये त्यांनी बायर्नकडून खेळताना तर १९९८ मध्ये कॅसरस्लॉटर्नकडून खेळताना चॅम्पियनशिप जिंकली होती.