दैनिक भ्रमर : भारतातील फुटबॉलपटू चाहत्यांसाठी तसेच लिओनेल मेस्सीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण जगप्रसिद्ध फुटबॉलपटू म्हणून प्रसिद्धी मिळवणाऱ्या लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याला अखेर अंतिम मंजुरी मिळाली आहे. या दौऱ्याची सुरुवात 12 डिसेंबर रोजी कोलकाता शहरातून होणार असून, मेस्सी फुटबॉलप्रेमींना भेटण्यासाठी सज्ज झाला आहे.
'GOAT Tour of India 2025' असे नाव दिलेल्या या दौऱ्याची सुरुवात कोलकाता येथून होईल. त्यानंतर मेस्सी अहमदाबाद, मुंबई आणि नवी दिल्ली येथे जाईल. त्यानंतर १५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन या दौऱ्याचा समारोप होणार आहे. २०११ नंतर मेस्सीचा हा पहिला भारत दौरा आहे, तेव्हा तो आपल्या राष्ट्रीय संघासोबत कोलकाता येथे व्हेंझुएलाविरुद्ध एक मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी आला होता. मेस्सीच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारतीय फुटबॉलपटूंच्या पुढील पिढीला प्रेरणा देणे हा आहे. मेस्सी प्रत्येक शहरात मुलांसाठी 'मास्टरक्लास' घेणार आहे.