जगभरातील फुटबॉलप्रेमींना हादरवून टाकणारी घटना घडली आहे. लिव्हरपूल आणि पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू डिओगो जोटा आणि त्याचा भाऊ आंद्रे सिल्वा यांचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे फुटबॉलविश्व शोकसागरात बुडालं.
या घटनेच्या काही दिवस आधी जोटाने त्याची बालपणीची मैत्रीण रुटे कार्डोसोशी लग्न केले होते. त्यानंतर या स्टार खेळाडूने जगाचा निरोप घेतला. ही बातमी जगासमोर आल्यापासून प्रत्येकजण त्याच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. आता या प्रकरणात स्पॅनिश पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.
स्पॅनिश पोलिसांच्या प्राथमिक तपासातून स्पष्ट झालं आहे की, गाडी जोटा स्वतः चालवत होता आणि तो ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेगात गाडी चालवत होता. त्यामुळेच हा भयानक अपघात झाला.
पोर्तुगालमधून ते स्पेनच्या सेंटेंडर शहराकडे लिव्हरपूल संघाच्या प्री-सीजन ट्रेनिंगसाठी निघाले होते. पण ए-53 महामार्गावर, मध्यरात्रीच्या सुमारास, त्यांच्या लेम्बोर्गिनी कारचा वेग इतका होता की, गाडी नियंत्रणातून गेली आणि कारला भीषण आग लागली. दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला.
जोटाचे नुकतेच झाले होते लग्न
या अपघातापूर्वी अवघ्या 10 दिवसांपूर्वी जोटाने आपल्या बालमैत्रीण रूटे कार्डोसोसोबत विवाह केला होता. जोटाला तिघं लहान मुलं आहेत. विशेष म्हणजे, नुकत्याच एका किरकोळ सर्जरीनंतर डॉक्टरांनी त्यांना विमान प्रवास टाळण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळेच जोटा भावासह गाडीने प्रवास करत होता.
लिव्हरपूल क्लबकडून कुटुंबाला आर्थिक मदत
लिव्हरपूल क्लबने जोटाच्या कुटुंबाला मदतीचं आश्वासन दिलं आहे. जोटाचा पाच वर्षांचा करार होता, ज्यामध्ये अजून दोन वर्ष बाकी होते. त्याची किंमत सुमारे 20 मिलियन डॉलर्स (भारतीय रुपयांमध्ये जवळपास 160 कोटी रुपये) इतकी आहे. हा संपूर्ण रक्कम त्याची पत्नी रूटे आणि तीन लहान मुलांना दिली जाणार आहे.
फुटबॉल विश्वानं दिला अंतिम निरोप
जोटा आणि त्याचा भाऊ आंद्रे यांच्या अंत्यसंस्कारात लिव्हरपूल आणि पोर्तुगाल संघाचे अनेक खेळाडू सहभागी झाले होते. त्यांचं पार्थिव गोंडोमार या त्यांच्या गावी नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.