अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज भारत दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी दिल्लीत असेल. दुपारी 2:30 वाजेपासून तो अरुण जेटली स्टेडियममध्ये आयोजित सत्कार समारंभात सहभागी होईल. तथापि, लोकांसाठी सकाळी 11:30 वाजता गेट उघडले जाईल. मेस्सी आज मुंबईहून दिल्लीसाठी चार्टर्ड विमानाने रवाना होईल. त्याचे विमान दुपारी सुमारे 12:30 वाजता दिल्लीत पोहोचण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, राष्ट्रीय राजधानीत येण्यापूर्वी लीला पॅलेस हॉटेलमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
कोलकाता आणि हैदराबाद येथील उत्साहानंतर, आता दिल्लीत मेस्सीला भेटण्यासाठी कॉर्पोरेट आणि उच्चभ्रू वर्गात जबरदस्त चढाओढ पाहायला मिळत आहे. या दौऱ्यादरम्यान मेस्सीसोबत केवळ हस्तांदोलन आणि फोटो काढण्यासाठी काही बड्या कंपन्यांनी तब्बल १ कोटी रुपयांपर्यंत रक्कम मोजल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मेस्सीच्या दिल्ली भेटीसाठी अभेद्य सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी हॉटेलचा संपूर्ण एक मजला आरक्षित करण्यात आला आहे.
हॉटेलमध्ये निवडक व्हीआयपी आणि कॉर्पोरेट पाहुण्यांसाठी खास 'मीट अँड ग्रीट' कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, या खासगी कार्यक्रमात मेस्सीला भेटण्याची संधी मिळवण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांनी १ कोटी रुपयांपर्यंत खर्च केला आहे.
मेस्सीच्या या तीन दिवसीय भारत दौऱ्यात (कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली) दिल्ली हे शेवटचे ठिकाण आहे. येथील व्यस्त कार्यक्रमांमध्ये मेस्सीची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतही भेट होणार आहे. मेस्सी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी देखील जाणार आहे. पटेल हे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अनेक वर्षे अध्यक्ष देखील होते.
एका सामान्य चाहत्यासाठी मेस्सीच्या जाहीर कार्यक्रमाचे तिकीट सुमारे रु. ४,७२० पासून सुरू होते, तर मुंबई-दिल्ली येथे 'मीट अँड ग्रीट'चे सामान्य पॅकेज सुमारे १० लाख रुपयांमध्ये उपलब्ध होते.