भारताचा माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सन याने आत्महत्या केली आहे. गुरुवारी त्याने आपल्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
त्याच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र शोककळा पसरली. चाहते त्याला श्रद्धांजली वाहतात. जॉन्सनने भारतासाठी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड यांच्यासोबत कसोटी सामने खेळले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्नाटककडून रणजी ट्रॉफी खेळणारा जॉन्सन डिप्रेशनमध्ये होता.
डेव्हिड जॉन्सनने टीम इंडियासाठी २ कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्याने ८ धावा केल्या आणि ३ बळी घेतले. जॉन्सनने ३९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४३७ धावा केल्या आणि १२५ विकेट घेतल्या. लिस्ट ए क्रिकेटमध्ये ३३ सामन्यांमध्ये त्याने ११८ धावा केल्या आणि ४१ विकेट्स घेतल्या. डेव्हिड जॉन्सनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून भारतीय संघात प्रवेश केला. त्याने १९९५-९६ च्या रणजी करंडक स्पर्धेत केरळविरुद्ध १५२ धावांत १० बळी अशी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी केली होती.
यामुळे त्याची भारतीय संघात निवड झाली आणि त्याने १९९६ मध्ये फिरोजशाह कोटला येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण केले. तेव्हा श्रीनाथला दुखापतीमुळे या मालिकेत खेळता आले नव्हते आणि जॉन्सनला संधी मिळाली.
त्याने त्याचा कर्नाटक संघाचा सहकारी व्यंकटेश प्रसादच्या साथीने गोलंदाजी केली आणि दुसऱ्या डावात मायकेल स्लेटरची विकेट घेतली. त्यानंतर जॉन्सन दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला, पण त्याला पहिल्याच कसोटीत खेळायला मिळाले. त्याने गिब्स आणि मॅकमिलनच्या विकेट्स घेतली.