भारतातील सर्वात मोठी फॅन्टसी गेमिंग कंपनी असलेल्या ड्रीम 11 ने ऑनलाइन गेमिंगसंदर्भात बनलेल्या नवीन कायद्यामुळे भारतीय संघाच्या जर्सी स्पॉन्सरशिपमधून माघार घेतली आहे. त्यांनतर भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवरील लीड स्पॉन्सर म्हणून कोण असेल यावर विविध चर्चा सुरु होत्या. अखेर या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
टीम इंडियाच्या जर्सीवर आता अपोलो टायर्सची निवड झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. अपोलो टायर्सकडून प्रतिमॅच ४.५ कोटी रुपये दिले जाऊ शकतात अशी माहिती आहे. यापूर्वी ड्रीम 11 कडून प्रत्येक मॅचसाठी बीसीसीआयला ४ कोटी रुपये दिले जायचे. बीसीसीआयकडून मात्र याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
बीसीसीआयनं 2 सप्टेंबरला लीड स्पॉन्सरशिपसाठी बोली लावण्यासाठी कंपन्यांना आमंत्रित केलं होतं. बीसीसीआयकडून जारी करण्यात आलेल्या नियमांनुसार गेमिंग, बेटिंग, क्रिप्टो, तंबाखू कंपन्यांना बोली लावण्यास मनाई करण्यात आली होती. मीडिया रिपोर्टनुसार Canva आणि JK Tyres ने देखील टीम इंडियाच्या जर्सी स्पॉन्सरशिपसाठी बोली लावली होती. अखेर अपोलो टायर्सची निवड झाली.
दरम्यान, अपोलो टायर्स इतर टीमसोबत जोडलेली आहे. प्रामुख्यानं फुटबॉल क्लबला ते स्पॉन्सर करतात. मँचेस्टर यूनायटेड, चेन्नेन एएफसी आणि इंडियन सुपर लीग सोबत अपोलो टायर्सचे करार आहेत. शेअर बाजारात अपोलो टायर्स कंपनीचा शेअर 487 रुपयांवर पोहोचला आहे. आज शेअर बाजारात या कंपनीचा स्टॉक 7.80 रुपयांनी वाढला आहे.