तब्बल 128 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन करत आहे. अखेरचे क्रिकेट सामने 1900 साली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळवण्यात आले होते. त्यावेळी केवळ ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स या दोनच संघांनी सहभाग घेतला होता. त्या ऐतिहासिक सामन्यात ग्रेट ब्रिटनने विजय मिळवून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले होते. तेव्हापासून क्रिकेट ऑलिम्पिकच्या पटलावरून दूर होते. आता लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमुळे क्रिकेटला पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑलिम्पिक 2028 मधील क्रिकेटचे सामने लॉस एंजेलिसपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या पोमोना शहरातील ‘फेअरग्राउंड्स स्टेडियम’मध्ये आयोजित केले जातील. या स्पर्धेला 12 जुलै 2028 रोजी सुरुवात होईल, तर सुवर्णपदकासाठीचे अंतिम सामने 20 आणि 29 जुलै रोजी खेळवले जातील. एकूण 16 दिवस क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) 2028 च्या ऑलिम्पिकसाठी पाच नवीन खेळांना मंजुरी दिली होती. यामध्ये क्रिकेटसह बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅश या खेळांचा समावेश आहे.