क्रिकेटविश्वातून आनंदाची बातमी समोर अली आहे. म्हारी छोरियां छोरों से कम हैं के? जणू याचाच प्रत्यय या सामन्यात आला आहे. वुमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात आयसीसी वनडे वर्ल्ड कप विजयानंतर आणखी एक मोठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टीम इंडियाने यजमान ऑस्ट्रेलियावर तिसऱ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात 17 धावांनी मात केली आहे.
भारताने ऑस्ट्रेलियासमोर 176 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं.स्मृती मंधाना हीने 82 धावा केल्या होत्या. भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 159 धावांपर्यंतच पोहचता आलं. टीम इंडियाने या विजयासह मालिकाही जिंकली आहे. भारताने ही मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली आहे.
टीम इंडियाने यासह इतिहास घडवला आहे. भारताची ऑस्ट्रेलियाच्या भूमीत आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. याआधी वूमन्स टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात कोणतीही मालिका जिंकता आली नव्हती. मात्र हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने ही कामगिरी करुन दाखवली आहे.