आयपीएल 2026 च्या चौथ्या मॅचमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध विजय मिळवूनही पंजाब किंग्सचा (PBKS vs GT) कॅप्टन श्रेयस अय्यर याच्या अडचणीत वाढ झाली आहे. पंजाब किंग्सने पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. मात्र आता श्रेयस अय्यर याच्या अडचणीत बीसीसीआयने वाढ केली असून त्याला तब्बल12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल इतिहासातील श्रेयस पहिला कॅप्टन आहे, ज्याच्यावर एवढी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
श्रेयस अय्यरला दंड का ?
पंजाबने आयपीएल २०२६ मधील आपला सलामीचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध 3 गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 162 धावा केल्या. प्रत्युत्तरात, पंजाब किंग्सने 19.1 षटकांत 7 गडी गमावून 163 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. सांघिक कामगिरीच्या दृष्टीने, हा सामना पंजाब किंग्ससाठी चांगला ठरला. पण, फक्त श्रेयस अय्यरबद्दल बोलायचं झाल तर, त्याच्या हाताला दुखापत झाली, तो फक्त 18 धावांवर स्वस्तात बाद झाला आणि त्यानंतर त्याला दंडही ठोठावण्यात आला.
ओव्हर रेट स्लो ठेवल्याबद्दल पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार, ओव्हर रेट कमी ठेवल्याच्या नियमाचे उल्लंघन करण्याची पंजाब किंग्सची ही पहिलीच वेळ असल्याने कर्णधार श्रेयस अय्यरला 12 लाख रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. यामुळे तो चांगलाच अडचणीत सापडला आहे.
न्यू चंदीगड येथील न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये पंजाबच्या टीमने स्लो ओव्हर-रेट (Slow Over-rate) राखल्याने बीसीसीआयने ही सर्वात मोठी कारवाई केली आहे. मैदानावर निर्धारित वेळेत ओव्हर्स पूर्ण न केल्यामुळे श्रेयस अय्यरला आता दंड भरावा लागणार आहे.
2025 च्या हंगामापासून, BCCIने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केला आहे. आयसीसीच्या आचारसंहितेनुसार आता डिमेरिट पॉइंट्स दिले जातात. पूर्वी, जर कर्णधाराच्या संघाने एका हंगामात तीन ओव्हर-रेटचे उल्लंघन केले, तर त्याच्यावर एका सामन्याची बंदी घातली जात असे. 2024 च्या हंगामात, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या (ज्याच्यावर 2025 हंगामाच्या पहिल्या सामन्यासाठी बंदी घालण्यात आली होती) यांना निलंबित करण्यात आले होते.