ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर एका कायदेशीर वादात अडकला आहे.डेव्हिड वॉर्नर याच्यावर मद्यपान करून वाहन चालवल्याप्रकरणी (ड्रंक अँड ड्रायव्हिंग) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडनीमधील मारौब्रा येथे एका 'रँडम ब्रीथ टेस्ट'दरम्यान (श्वसन चाचणी) पोलिसांनी त्याला थांबवले असता ही कारवाई करण्यात आली.दरम्यान यानंतर त्याची सुटका करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ३९ वर्षीय वॉर्नरने तपासणी नाक्यावर पोहोचण्यापूर्वीच आपली कार थांबवून पार्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशय आल्याने पोलिसांनी त्याच्या वाहनापाशी जाऊन त्याची रँडम ब्रीथ टेस्ट घेतली. या चाचणीत तो मद्याच्या नशेत असल्याचे आढळले. पोलिसांनी तात्काळ वॉर्नरला ताब्यात घेऊन मारौब्रा पोलीस ठाण्यात नेले, जिथे त्याच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण ०.१०४ इतके नोंदवण्यात आले. याप्रकरणी त्याला पुढील महिन्यात न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
वॉर्नर सध्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) २०२६ मध्ये 'कराची किंग्स'चे नेतृत्व करत आहे. स्पर्धेतील सामन्यांमध्ये काही दिवसांची विश्रांती असल्याने तो काही काळासाठी ऑस्ट्रेलियाला परतला होता. या घटनेनंतर तो पुन्हा पाकिस्तानात रवाना झाला असला, तरी सुनावणीसाठी त्याला पुन्हा ऑस्ट्रेलिया गाठावे लागणार आहे.