क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धकांसोबत वाद घडणं काही नवीन नाही. अनेकदा भर मैदानात हे क्रिकेटपटू एकमेकांवर आक्रमक झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता पुन्हा एकदा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडेन सील्सने यशस्वी जैस्वालवर रागाने चेंडू फेकला. या प्रकरणी जेडेन सील्सवर कारवाई करण्यात आली आहे.

दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. आज सामन्यातील चौथा दिवस असून भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे. दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारताने आधीच 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारतविरुद्ध दुसरा कसोटी सामना सुरु असताना आयसीसीने वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडेन सील्सवर मोठी कारवाई केली आहे.
कारवाई का ?
जेडेन सील्स गोलंदाजी करत असताना यशस्वी जैस्वालने खेळलेला चेंडू जेडेनच्या हातात गेला. यानंतर जेडेनने तोच चेंडू रागाने यशस्वी जैस्वालच्या दिशेने फेकला. ज्याची काहीच गरज नव्हती. जेडेनच्या या कृतीवर यशस्वी जैस्वालने मैदानात कोणतीच रिअॅक्शन दिली नाही. मात्र आता आयसीसीने जेडेनवर आतापर्यंतची मोठी कारवाई केली आहे.
या प्रकरणी आयसीसीने सील्सला लेव्हल 1 आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आणि त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या 25 टक्के दंड ठोठावला. तसेच जेडेन सील्सच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंटही दिला आहे. या दंडासह, सील्सचे आता एकूण दोन डिमेरिट पॉइंट आहेत. जर एखाद्या खेळाडूने 24 महिन्यांत चार किंवा त्याहून अधिक डिमेरिट पॉइंट जमा केले तर त्यांच्यावर बंदी घातली जाऊ शकते. भविष्यात अशाच घटनांवर अधिक कठोर कारवाई केली जाईल असा इशारा आयसीसीने दिला आहे.