टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील ग्रुप ब मध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. या गटात सर्वाधिक धक्कादायक निकाल लागले आहेत. या गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड आणि ओमान हे संघ आहेत. त्यामुळे या गटातून स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या संघांना पसंती दिली गेली होती. पण प्रत्यक्षात या गटात वेगळंच घडलं. कोणाच्या ध्यानीमनी नसेल असा निकाल या गटात लागला.
आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांचातला टी-20 वर्ल्ड कपचा सामना पावसामुळे रद्द झाला आहे, पण या पावसाने ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांचा चक्काचूर केला आहे.सुपर-8 मध्ये प्रवेश करण्यासाठी या सामन्यात आयर्लंडच्या विजयासाठी ऑस्ट्रेलिया प्रार्थना करत होती, पण केन्डीच्या पॅलकेल्लीमध्ये सकाळपासूनच पाऊस सुरू होता, त्यामुळे मॅचमध्ये एकही बॉल टाकला गेला नाही. झिम्बाब्वे आणि आयर्लंड सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण दिला आहे. त्यामुळे झिम्बाब्वेला थेट सुपर 8 फेरीचं तिकीट मिळालं आहे.
पाऊस थांबण्याचं नाव घेत नसल्याने कटऑफ टाईम असलेल्या संध्याकाळी 6.10 पर्यंत वाट पाहिली गेली. त्यानंतर हा सामना ड्रॉ झाल्याचं घोषित केलं. यासह झिम्बाब्वेच्या खात्यात 5 गुण जमा झाले आहे. त्यामुळे या गटातून श्रीलंकेनंतर झिम्बाब्वेने एन्ट्री मारली आहे. कारण शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला तरी 4 गुण होतील. तर आयर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि ओमान यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. सुपर 8 फेरीत जागा मिळवणारा झिम्बाब्वे हा सातवा संघ ठरला आहे.
अ गटातून भारताने सुपर 8 फेरीत धडक मारली आहे. आता पाकिस्तान आणि अमेरिका यापैकी कोणाला संधी मिळते याची उत्सुकता आहे. पाकिस्तान आणि नामिबिया सामन्यावर हे अवलंबून आहे. या सामन्यात नामिबियाने विजय मिळवला तर अमेरिकेला संधी मिळेल. पण पाकिस्तानने हा सामना जिंकला किंवा पावसामुळे रद्द झाला. तर पाकिस्तानला संधी मिळेल. आता या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.