कोलंबोच्या के आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आज, १३ फेब्रुवारीला जे झालं त्याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नसेल. टी20 वर्ल्ड कपच्या ग्रुप बीमध्ये झिम्बाब्वेने मोठो उलटफेर करत ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चीत केलं. यासह, झिम्बाब्वेने स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे. त्यांनी यापूर्वी अमोनच्या संघाला पराभूत केले होते. टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झिम्बाब्वेचा हा दुसरा विजय आहे. यापूर्वी 2007 मध्येही झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. त्यानंतर तब्बल १९ वर्षंनी इतिहासाची पुनरावृत्ती झाली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा झिम्बाब्वेचा निर्णय सार्थ ठरला. सुरुवातीपासूनच झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर दबाव टाकला. निर्धारित 20 षटकांत झिम्बाब्वेने केवळ 2 गडी गमावून 169 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर ब्रायन बेनेटने 7 चौकारांसह 64 धावांची शानदार नाबाद खेळी केली. तदिवानाशे मारुमानी यांनीही 11 चेंडूत 35 धावा केल्या. रायन बर्लने 30 चेंडूत 35 धावा केल्या आणि कर्णधार सिकंदर रझा यांनी 13 चेंडूत नाबाद 25 धावा करून संघाला या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी 170 धावांचं आव्हान म्हणजे जणू काही डाव्या हाताच मळंच. त्य्यांना हे टार्गेट सहज गाठता येईल असं बहुतांश लोकांना वाटलं. मात्र ऑस्ट्रेलियाची सुरूवातच वाईट झाली. पॉवरप्लेमध्ये चार विकेट गमावल्या, तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर फक्त 38 होता. स्टार फलंदाज जोश इंग्लिस, कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड आणि ट्रॅव्हिस हेड लवकर बाद झाले, जो ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का होता. मधल्या षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाचे मॅट रेनशॉ आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात 77 धावांची भागीदारी झाली, त्यांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतु झिम्बाब्वेने डेथ ओव्हर्समध्ये पुनरागमन केले आणि सामना सहज जिंकला. ऑस्ट्रेलियाचा संघ 19.3 षटकांत 146 धावांवर ऑलआऊट झाला आणि त्यांना तब्बल 23 धावांनी पराभव पत्करावा लागला.
गुणतालिकेतील समीकरण बदलले
या ऐतिहासिक विजयानंतर 'ग्रुप बी' मध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. झिम्बाब्वेने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर ऑस्ट्रेलिया थेट तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियासाठी हा पराभव जिव्हारी लागणारा आहे, कारण या पराभवासह ते आता स्पर्धेतून बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत. झिम्बाब्वेसाठी हा केवळ विजय नसून जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करण्याची मोठी संधी ठरली आहे.