नवी दिल्ली : क्रिकेटवेड्या भारतीयांसाठी एक खूशखबर आहे. कारण आता ऑलिम्पिकमध्ये T20 क्रिकेटचा थरार पहायला मिळणार आहे. तब्बल १२८ वर्षांचा ऑलिम्पिकचा इतिहास बदलला असून पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मुंबईत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने शुक्रवारी २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी क्रिकेटला मान्यता दिली. आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी ही मोठी घोषणा केली. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे क्रीडा संचालक किट मॅककोनेल यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, लॉस एंजेलिस समितीने ऑलिम्पिकचा भाग होऊ शकणाऱ्या पाच खेळांचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये क्रिकेटचाही समावेश आहे. या प्रस्तावानंतर आज क्रिकेटला ऑलिम्पिकसाठी मान्यता देण्यात आली.
दरम्यान भारतासाठी हा महत्वाचा भाग ठरणार आहे. कारण सध्या सुरु असलेला आयसीसीचा क्रिकेट वर्ल्डकपचं भारतानं आयोजन केलं आहे. त्याचबरोबर मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये नुकतंच १४१ व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीच्या सेशनंच आयोजन केलं होतं, तब्बल ४० वर्षानंतर भारतात हे पार पडलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या सेशनचे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी दावा केला होता की, २०३६ च्या ऑलिम्पिकचं यशस्वी आयोजन करण्यासाठी भारत कोणतीही कस सोडणार नाही.
चार खेळांचा होणार ऑलिम्पिकमध्ये समावेश
IOC च्या कार्यकारी बोर्डानं गेल्या आठवड्यात लॉस एन्जेलिसच्या ऑलिम्पिकसाठी ज्या खेळांचा समावेश करायचा आहे, त्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. यामध्ये पुरुष आणि महिलांच्या क्रिकेटच्या T20 फॉरमॅटशिवाय इतर चार खेळाचा समावेश आहे. बेसबॉल-सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रॉझ आणि स्क्वॅश हे ते खेळ आहेत.