नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावरील महाराष्ट्र विरूद्ध सौराष्ट्र हा रणजी करंडकाच्या सामन्याच्या पहिला दिवस पावसामुळे वाया गेला.
चार दिवसांच्या रणजी सामन्याच्या पहिल्याच दिवशी रात्री उशीरा पडलेल्या पावसामुळे मैदान ओलसर होते. त्यामुळे पंचांनी सकाळी ११.३० वाजता आणि त्यानंतर तीन वाजता पुन्हा एकदा मैदानाचे निरीक्षण केले. मात्र मैदान ओलसर असल्यामुळे खेळ सुरू होण्यासाठी तयार नव्हते. अखेर पंचांना पहिला दिवसाचा खेळ समाप्त झाल्याची घोषणा करावी लागली.
महाराष्ट्र आणि सौराष्ट्राच्या खेळाडूंना दोनदा बसने हॉटेलवर जावे लागले व पुन्हा एकदा मैदानावर यावे लागले मात्र त्यांचाही हिरमोड झाला. येत्या २४ तासात पुन्हा एकदा नाशिक शहरात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आल्यामुळे रविवार (उद्या) सकाळी तरी खेळ सुरू होणार की नाही? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.