आगामी टी 20 विश्वचषकात रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव जय शाह यांनी याबाबतची घोषणा केलीये. राजकोटमध्ये इंग्लंड आणि भारतादरम्यान कसोटी सामन्याला उद्या सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जय शाह यांनी ही घोषणा केली आहे.
भारताने २०२३ सालातील विश्वचषकात संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. सलग १० विजयामुळे यावेळी भारतच विश्वचषकावर आपले नाव कोरणार असे समस्त क्रिकेटप्रेमींना वाटत होते. मात्र या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दुर्दैवाने भारताचा पराभव झाला.
दरम्यान, या पराभवामुळे रोहित शर्मा कर्णधारपद सोडणार का? त्याला कर्णधारपदापासून दूर केले जाणार का? असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. यावरच आता आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदावर भाष्य केले आहे.
दरम्यान "2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात आपला पराभव झाला असला तरी टीम इंडिया चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी ठरली होती. भारताने सलग 10 सामने जिंकले. मला पूर्ण विश्वास आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया यंदाचा टी-२० विश्वचषक जिंकण्यात यशस्वी होईल", असा विश्वास जय शाह यांनी व्यक्त केला.
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार टी-२० विश्वचषक
दरम्यान, आगामी टी-२० विश्वचषकासाठी रोहित शर्मा आणि धडाडीचा फलंदाज विराट कोहली यांचा भारतीय संघात समावेश केला जाणार की त्यांना विश्रांती दिली जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र जय शाह यांच्या या विधानानंतर रोहित शर्मा भारतीय संघात असेल तसेच त्याच्याकडे पूर्ण संघाचे नेतृत्व असेल हे स्पष्ट झाले आहे. आगामी टी-२० विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तरित्या आयोजित केला जाणार आहे. त्याची तयारी आता भारतीय संघाने सुरू केली आहे.