अफगाणिस्तानने रचला इतिहास! ऑस्ट्रेलिया T20 World Cup मधून बाहेर
अफगाणिस्तानने रचला इतिहास! ऑस्ट्रेलिया T20 World Cup मधून बाहेर
img
Dipali Ghadwaje
टी-20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानने पुन्हा एक चमत्कार केला आहे. अफगाणिस्तानने सुपर 8 च्या शेवटच्या सामन्यामध्ये अत्यंत रोमहर्षक पद्धतीने बांगलादेशवर विजय मिळवला. त्यामुळे अफगाणिस्तानचा संघ सेमी-फायनलसाठी पात्र ठरला असून अफगाणिस्तानच्या या विजयामुळे ऑस्ट्रेलियन संघ टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे.

त्यामुळे आता अफगाणिस्तानचा संघ सेमी-फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 28 तारखेला मैदानात उतरणार आहे. तर सेमी-फायनलचा पहिला सामना भारत आणि इंग्लंडदरम्यान 27 तारखेला होणार आहे. 

सोमवारी भारताने ऑस्ट्रेलियाला 24 धावांनी पराभूत करत सेमी-फायनल गाठली. मोठ्या फरकाने भारत जिंकल्याने आज अफगाणिस्तानला केवळ विजय मिळवण्याची आवश्यकता होती. टॉस जिंकल्यानंतर अफगाणिस्तानने आधी फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर रेहमानुल्ला गुरबाजने 55 बॉलमध्ये 43 धावांची उत्तम खेळी केली.

मात्र त्यानंतर एकाही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा गाठता आला नाही. त्यामुळे अफगाणिस्तानला या 'करो या मरो'च्या सामन्यात 20 ओव्हरमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 115 धावांपर्यंतच मजल मारता आली. बांगलादेशकडून राशीह हुसैनने 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तस्कीन अहमद आणि मुस्तफिजूर रेहमानने प्रत्येकी 1 विकेट घेतली. 

केवळ एकच फलंदाज टिकून होता
116 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या संघातून केवळ लिटन दासने उत्तम फलंदाजी केली. तो 49 बॉलमध्ये 54 धावा करुन नाबाद राहिला. मात्र एकीकडे लिटनने धावा जमवणं सुरु ठेवलेलं असतानाच दुसऱ्या बाजूला बांगलादेशचे खेळाडू केवळ हजेरी लावून दात होते. बांगलादेशच्या फलंदाजीदरम्यान पावसाचा व्यत्यय आल्याने विकेट्स आणि धावांचा विचार करुन नवं टार्गेट बांगलादेशला देण्यात आलं.

नवं टार्गेट देण्यात आलं
बांगलादेशला डकवर्थ लुईसच्या नियमानुसार 19 ओव्हरमध्ये 116 ऐवजी 114 धावांचं लक्ष्य देण्यात आलं. मात्र 7 बॉल बाकी असतानाच बांगलादेशचा संपूर्ण संघ तंबूत परतला. शेवटच्या 8 बॉलमध्ये 9 धावा हव्या असताना बांगलादेशचा शेवटचा फलंदाज पायचित झाला अन् अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष सुरु केला. 

अफगाणिस्तानची उत्तम गोलंदाजी
अफगाणिस्तानचा कर्णधार राशीद खानने 4 ओव्हरमध्ये 23 धावा देत 4 गडी बाद केले. तर नवीन-उल-हकनेही आपल्या 3.5 ओव्हरमध्ये 26 धावांच्या मोबदल्यात बांगलादेसच्या 4 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. गुलबदिन नाबीने 2 ओव्हरमध्ये केवळ 5 धावा देत 1 विकेट घेतली. अफगाणिस्तानच्या संघाने यापूर्वी या स्पर्धेत न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियालाही धूळ चारली आहे.

हे चार संघ पात्र
अफगाणिस्तान या विजयासाठी सेमी-फायनलमध्ये पोहचला आहे. पाहिल्यांदाच हा संघ टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी-फायनलमध्ये पोहोचला आहे. अफगाणिस्तान असलेल्या गट 1 मधून त्यांच्या आधीच भारत पात्र ठरला असून. गट 2 मधून पहिल्या स्थानी इंग्लंड आणि दुसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा संघ पात्र ठरला आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group