अलीकडच्या काळात जगभरात भूकंपाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्यातच, रशियाच्या कुरिल द्वीपसमूहाच्या पूर्वेला 6.0 तीव्रतेचा भूकंप आला होता. त्याची खोली 10 किलोमीटर होती. त्याचप्रमाणे, 30 जुलै रोजी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्यावर 8.8 तीव्रतेचा एक अतिशय शक्तिशाली भूकंप आला होता. ज्यामुळे अधिकाऱ्यांनी देशाच्या काही भागात त्सुनामीची चेतावणी जारी केली होती.
दरम्यान, अफगाणिस्तमध्ये देखील भीषण भूकंप झाला .अफगाणिस्तच्या पूर्वेकडील भागात रविवारी रात्री उशीरा ६.० तीव्रतेचा भीषण भूकंप झाला. या भूकंपामध्ये सुमारे ५०० लोक मृत्युमुखी पडले असून एक हजारांहून अधिक जखमी झाले आहेत, अशी माहिती सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या रेडिओ टेलिव्हिजन अफगाणिस्तानने दिली आहे. या भूकंपामुळे अनेक घरे कोसळली असून या घरांच्या ढिगाऱ्यांखालून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून शोध घेतला जात आहे.
“मृतांची आणि जखमींची संख्या मोठी आहे, पण या भागात पोहचणे अवघड असल्याने आमच्या टीम अजूनही घटनास्थळी आहेत,” असे आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते शाराफत झमान यांनी त्यांच्या निवेदनात सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक वेळेनुसार रात्री ११:४७ वाजता हा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र हे नांगरहार प्रांतातील जलालाबादपासून सुमारे २७ किलोमीटर ईशान्येला होते. फक्त ८ किलोमीटर खोलीवर झालेल्या भूकंपामुळे कुनार प्रांतात मोठी हानी झाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. शेकडो जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे