इंडोनेशियाच्या तलाउड बेटांवर मंगळवारी (9 जानेवारी) 6.7 तीव्रतेचा भूकंपाचे धक्के बसले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या खाली 80 किमी खोलीवर होता. भारतीय वेळेनुसार रात्री 2.18 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सोशल मीडिया साइट एक्स वर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भूकंपाचे हे धक्के इंडोनेशियातील तलाउड बेटावर जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीपासून 80 किमी खाली होता. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे ने सांगितले की, गेल्या आठवड्यात गुरुवारी इंडोनेशियातील बलाई पुंगुट येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
इंडोनेशियामध्ये 6.7 तीव्रतेचा भूकंप होऊनही, अद्याप कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. इंडोनेशियामध्ये सतत भूकंपाचे धक्के जाणवतात, त्यामागील मुख्य कारण म्हणजे या ठिकाणची भौगोलिक रचना आहे.
इंडोनेशिया हे पॅसिफिक महासागराच्या रिंग ऑफ फायरवर वसलेले आहे, त्यामुळे तेथे सतत भूकंप होत असतात. रिंग ऑफ फायर पॅसिफिक, कोकोस, भारतीय-ऑस्ट्रेलियन, जुआन डी फुका, नाझका, उत्तर अमेरिकन आणि फिलीपीन टेक्टोनिक प्लेट्सशी जोडलेलाी आहे
जपानमध्ये एक जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.6 इतकी मोजली गेली होती. या भूकंपामुळे तेथे सुनामीचा इशाराही देण्यात आला होता. जपानमधील भूकंपामुळे आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.