नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा) :- मोरोक्कोमध्ये रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.8 इतकी मोजण्यात आली आहे. मोरोक्कोच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भूकंपामुळे किमान 300 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 153 नागरिक जखमी झाले आहेत.
मात्र या भूकंपातील मृतांची संख्या लक्षणीय वाढू शकते. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मराकेश शहरापासून 71 किमी दक्षिण-पश्चिमेस 18.5 किमी खोलीवर होता. स्थानिक वेळेनुसार रात्री 11.11 वाजेच्या सुमारास येथे भूकंपाचे धक्के जाणवले.
या भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान शहराबाहेरील जुन्या भागाचे झाले आहे.
मोरोक्कोच्या अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर भूकंपाशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो देखील पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये इमारती कोसळल्यानंतर धुळीचे लोट पाहायला मिळत आहेत. मराकेशमध्ये युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. सोशल मीडियावर अनेक पर्यटकांनी भूकंपानंतर लोक धावताना आणि स्वत:चा जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करतानाचे व्हिडिओही पोस्ट केले आहेत.