राज्यात विदर्भात आज सकाळी ७.२७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात हे धक्के बसले. अचानक जमिन हादरल्यामुळे नागरिक घाबरून घराबाहेर पडले.
भूकंपाचा केंद्रबिंदू हा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणातील मूलगु येथे असून याची तीव्रता ५.३ रिश्टर स्केल भूकंपमापकावर नोंदवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यात अद्याप तरी कोणत्याच प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानी झालेली नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्र यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन माहिती घेता येईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.