दैनिक भ्रमर : वाढणाऱ्या मानसिक तणावामुळे आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. त्यात विद्यार्थ्यांची संख्या अधिक दिसून येत आहे. गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या राजस्थान येथील आवेश कुमार नावाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा.डाॅ. प्रशांत बागडे यांनी विद्यार्थ्याच्या आईबद्दल अपशब्द उच्चारले होते. त्याशिवाय विद्यार्थ्याचा मानसिक छळ केल्याचं त्याने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.
सुसाईड नोटमध्ये काय ?
सुरुवातीला त्यानं त्याचं नाव लिहून पुढे त्याला झालेला त्रास सांगितलं आहे. त्याने या चिठ्ठीत लिहिलंय की वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिक्षकांचं वर्तन विद्यार्थ्यांप्रती चांगले असायला हवे. वाटल्यास विद्यार्थ्याला शिक्षा द्यायला काही हरकत नाही. परंतु विद्यार्थ्यांच्या आईवडिलांबाबत अपशब्दाचा वापर करुन मानसिक छळ करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. भविष्यात कुठल्याही विद्यार्थ्यासोबत असा व्यवहार घडू नये असे म्हणत, माझ्या आईवडीलांकडे लक्ष द्यावे असंही मुलाने या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
विद्यार्थ्याची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असून त्या विद्यार्थ्याने केलेल्या कृत्याची चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे चौकशीअंती नेमका प्रकार समोर येईल. याआधी गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.