आरक्षण नाही म्हणून एकीकडे मराठा समाजात अनेक तरुणांनी आयुष्य संपवले मग आंदोलने झाली , मोर्चे निघाले आणि अखेर मराठा आरक्षणाचा अनेक वर्षाचा संघर्ष संपत मराठा समाजाला आरक्षण मिळाले. आता हे आरक्षण ओबीसी समाजातून मिळाल्याने ओबीसी समाजात नाराजी पसरली. यानंतर आता ओबीसी समजातील युवकांचे आत्महत्या सत्र सुरु झाले. काही आठवड्यापूर्वीच ओबीसी समाजातील तरुणाने आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केली होती. आता पुन्हा एकदा अशीच धक्कादायक घटना परभणीमध्ये घडली.
ओबीसी आरक्षणासाठी एका २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. ही घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यात घडली. कुमार नारायण आघाव असं आत्महत्या केलेल्या २२ वर्षीय तरुणाचे नाव होते. शेतामधील लिंबाच्या झाडाला गळफास घेत त्याने आत्महत्या केली. ओबीसी आरक्षण गेलं, माझी मनस्थिती बरोबर राहिली नाही. असं म्हणत या शेतामध्ये जाऊन त्याने आयुष्य संपवलं. चार बहिणींचा एकुलता एक भाऊ असलेल्या कुमार नारायण आघावने हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
ओबीसी आरक्षण गेलं असं मी समाजापासून ऐकत आलो होतो. त्यामुळे माझी मनस्थिती बरोबर राहिली नव्हती. माझ्या डोक्यात सतत तोच विचार चालू होता. आमच्या तरुण बांधवांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मी माझ्या ओबीसी समाजासाठी माझे जीवन संपवून टाकतो.' अशी सुसाइड नोट लिहित कुमार नारायण आघावने आत्महत्या केली. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव दराडे येथे तो आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता.
या प्रकरणी जिंतूरच्या बोरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस सध्या तपास करत आहेत. कुमार आघाव हा त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याला ४ बहिणी आहेत. त्याच्या मृत्यूमुळे आघाव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.