गेल्या काही दिवसांत भारतात अनेक वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अनेकदा या भूकंपांमुळे जीवितहानीही झाली आहे. आता उत्तराखंडमध्ये भूकंप झाल्याचं समोर आलं आहे.
उत्तराखंडमधील पिथौरागढमध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.६ इतकी होती. आज सकाळी ९.५५ वाजता भूकंपाचे हे धक्के जाणवले आहेत. केवळ पिथौरागढच नाही तर आजुबाजूच्या जिल्ह्यांनाही भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं अजून समोर आलेलं नाही.
भूकंप कशामुळे होतो?
भूकंपाचे खरं कारण म्हणजे टेक्टोनिक प्लेट्सची वेगवान हालचाल. याशिवाय उल्कापात, ज्वालामुखीचा स्फोट किंवा आण्विक चाचणीमुळेही भूकंप जाणवू शकतो. पृथ्वीवर दरवर्षी मोठ्या संख्येने भूकंप होतात, परंतु बऱ्याच प्रकरणांमध्ये त्यांची तीव्रता कमी असल्याने ते जाणवत नाही. पण ज्यांची तीव्रता जास्त असते, अशा भूकंपामध्ये विध्वंस झाल्याचं समोर येतं.