अफगाणिस्तानने पापुआ न्यू गिनीचा सात विकेट्सनं धुव्वा उडवत सुपर 8 मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. अफगाणिस्तानच्या शानदार कामगिरीमुळे न्यूझीलंडंचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. साखळी फेरीमध्ये अफगाणिस्तानने न्यूझीलंडला जोरदार धक्का दिला होता, त्याचा फटका बसल्याचं दिसतेय. क गटामध्ये अफगास्तान सध्या पहिल्या क्रमांकावर आहे, तर यजमान वेस्ट इंडिज दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडला दोन्ही साखळी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. ते गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर आहेत.
आज झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पापुआ न्यू गिनीचा 7 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह अफगाणिस्तान सुपर-8 साठी पात्र ठरला आहे. राशिद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. T20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच अफगाणिस्तानने सलग तीन सामन्यात विजय मिळवलाय.
पापुआ न्यू गिनी संघाला प्रथम फलंदाजी करताना 95 धावाच करता आल्या. अफगाणिस्तानने हे आव्हान तीन विकेट आणि 15.1 षटकात सहज पार केले. अफगानिस्तानसाठी गुबल्दीन नईब याने 36 चेंडूत नाबाद 49 धावांची खेळी केली. त्याशिवाय मोहम्मद नबी याने नाबाद 16 धावांचे योगदान दिले.
नाणेफेक अफगाणिस्तानच्या पारड्यात,
अफगाणिस्तानचा कर्णधार राशीद खान यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पापुआ न्यू गिनी संघाला अफगाणिस्तानच्या माऱ्यापुढे टिका धरता आला नाही. ठरावीक अंतराने त्यांनी विकेट फेकल्या. पापुआ न्यू गिनीसाठी किपलिन डोरिगा याने सर्वाधिक धावा केल्या. किपलिन डोरिगाने 32 चेंडूत 27 धावांचं योगदान दिले. त्याशिवाय अले नाऊने 19 चेंडूत 13 धावा केल्या. तर सलामीवीर टोनी उराने 18 चेंडूत 11 धावांचे योगदान दिले. पापुआ न्यू गिनीच्या 8 फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही. त्यामुळे पापुआ न्यू गिनी संघ अवघ्या 95 धावांत गारद झाला.