देशभरातील विविध खेळ खेळणाऱ्या खेळाडूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी (दि.6) खेलो इंडिया गेम्सच्या खेळाडूंना मोठी भेट दिली. आता खेलो इंडियाचे खेळाडू सरकारी नोकऱ्यांसाठी पात्र असतील, अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी आपल्या ट्विटद्वारे दिली आहे.
2018 मध्ये पहिल्यांदा खेलो इंडिया गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हापासून या खेळांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. आता क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी या खेळांच्या निकषांमध्ये मोठा बदल केला आहे. खेलो इंडिया गेम्समध्ये पदक जिंकणारे खेळाडू आता सरकारी नोकरीसाठी पात्र ठरतील. यापूर्वी खेलो इंडिया गेम्सचे खेळाडू सरकारी नोकऱ्यांसाठी पात्र नव्हते, पण सरकारने खेळाडूंना मोठी भेट दिली आहे.
अनुराग ठाकूर यांनी ट्विटरवर लिहिले की, मला हे जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे की, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांच्याशी चर्चा केल्यानंतर सरकारी नोकऱ्यांचे निकष बदलण्यात आले आहेत. या पाऊलामुळे आता खेलो इंडियाचे पदक विजेते खेळाडू सरकारी नोकऱ्यासांठी पात्र असतील. या सुधारित नियमांमुळे भारत क्रीडा महासत्ता बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकेल.