आशिया चषक 2023 स्पर्धेचा किताब जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला असेल. आता भारताला 22 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हात करायचे आहेत. विश्वचषकाआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्याची वनडे मालिका होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे.
‘हे’ 2 खेळाडू मुकणार
पहिला वनडे सामना शुक्रवारी, 22 सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानात होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला दोन धक्के बसले आहेत. ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क पहिल्या वनडेतून बाहेर पडले आहेत. दुखापतीमुळे हे दोन्ही खेळाडू पहिल्या वनडे सामन्याला मुकणार आहेत. कर्णधार पॅट कमिन्स याने याबाबतची माहिती दिली. स्टार्क पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही, त्यामुळे त्याला आराम दिला जाणार आहे. तर मॅक्सवेलही दुखापतग्रस्त आहे, असे पॅट कमिन्स याने सांगितलेय.
भारत आणि ऑस्ट्रेलिया हेड टू हेड, काय स्थिती -
वनडेमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियान संघाचा कायम वरचष्मा राहिला आहे. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकदिवसीय प्रकारात 146 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने 82 सामन्यांत भारताचा पराभव केला आहे. तर भारतीय संघाला केवळ 54 सामन्यांमध्ये यश मिळाले आहे. याशिवाय भारत आणि ऑस्ट्रेलिया भारतीय भूमीवर ६७ वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने भारतीय भूमीवर टीम इंडियाचा 32 वेळा पराभव केला आहे. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 30 वेळा पराभव केला आहे.