भारताचा स्टार क्रिकेटपटू यश दयालच्या अडचणीत भर पडली आहे. यश दयालच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. यश दयालचा हा अजामीनपात्र गुन्हा आहे. या अंतर्गत यशला किमान १० वर्षांची शिक्षा होऊ शकते.
यशवर तरुणीला लग्नाचं आश्वासन देऊन आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप असल्याची माहिती आहे.
पीडित तरुणीने व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रिनशॉट, व्हिडिओ कॉल आणि फोटो पोलिसांना दिले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप तपास सुरु केलेला नाही. पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर तिचा जबाब नोंदवण्यात येईल.
त्यानंतर पोलिसांकडून कारवाईला सुरुवात होईल. पोलीस क्रिकेटपटू यश दयालला अटक देखील करू शकतात. यश दयालवर करण्यात आलेले आरोप सिद्ध झाले किंवा या प्रकरणात यश दयाल दोषी आढळल्यास त्याला १० वर्षांची शिक्षा होऊ शकते.
पीडित तरुणी गाझियाबादच्या इंदिरापुरम परिसरात राहणारी आहे. यश दयालच्या विरोधातील पोलीस तक्रारीत म्हटलं की, 'पीडित तरुणी आणि क्रिकेटपटू यश दयाल हे दोघे गेल्या ५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. यश दयालच्या कुटुंबीयांनी दोघांच्या लग्नाला मंजुरी दिली होती, असं पीडित तरुणीचा दावा आहे. तिचं नेहमी यश दयालच्या घरी येणे-जाणे होते'.
दरम्यान, यश दयालच्या कुटुंबीयांनी या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्याचबरोबर सोशल मीडियावरही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
यश दयालच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पीडित तरुणीने १४ जून रोजी महिलांच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल केला होता. मात्र, पुरेसी मदत न मिळाल्याने तिने २१ जून रोजी सीएम हेल्पलाइन नंबरवर तक्रार केली होती.