दैनिक भ्रमर : पाकिस्तानच्या क्रिकेटरसंबंधी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानचा फलंदाज हैदर अलीला इंग्लंडमधील ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सदर प्रकरणाची दखल घेत त्याला तात्काळ निलंबित केले आहे. २३ जुलै रोजी हैदर अलीने मँचेस्टरमध्ये बलात्कार केल्याचा अहवाल सादर झाल्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या २४ वर्षीय फलंदाजाला अटक करण्यात आली आहे. ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी हैदर अलीच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
हैदर अली इंग्लंडमध्ये पाकिस्तान 'ए' टीम (पाकिस्तान शाहीन) कडून मेलबर्न क्रिकेट क्लब विरुद्ध कँटरबरी मैदानावर सामना खेळत असताना, ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी त्याला थेट मैदानातून ताब्यात घेतलं.काही वेळाने त्याला जामिनावर सोडण्यात आलं असलं, तरी त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे, जेणेकरून तो इंग्लंड सोडून जाऊ शकणार नाही. ही घटना समोर आल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) देखील कारवाई केली असून, त्याला सध्या निलंबित करण्यात आलं आहे.
२४ वर्षीय हैदरचा जन्म 2 ऑक्टोबर 2000 रोजी पंजाब प्रांतातील अटॉकमध्ये झाला आहे. त्याने पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वनडे आणि टी-20 सामने खेळले असून टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध खेळण्याची संधी त्याला मिळाली होती.