भारतीय देशांतर्गत स्पर्धेतील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील उपांत्यपूर्व फेरीचे सामने संपले आहेत. या स्पर्धेचा शेवटचा उपांत्यपूर्व सामना दिल्ली आणि उत्तर प्रदेश संघांमध्ये बेंगळुरू येथे खेळला गेला. दिल्ली संघाने हा सामना जिंकून उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले.
मात्र या सामन्यादरम्यान दोन खेळाडू एकमेकांशी भिडले. नितीश राणा आणि युवा खेळाडू आयुष बदोनीमध्ये जोरदार वादावादी झाली. यानंतर पंचांनी प्रकरण शांत केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडले?
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील दिल्लीच्या डावादरम्यान ही घटना घडली. दिल्लीच्या डावात उत्तर प्रदेशचा खेळाडू नितीश राणा गोलंदाजी करत होता. तर दिल्लीचा कर्णधार आयुष बडोनी क्रीजवर होता. त्याने नितीशच्या षटकात एक फटका खेळत धाव घेऊन नॉन स्ट्राइकवर पोहोचला. आयुष धाव घेऊन येत असताना नितीश राणा मध्ये आल्याने दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, नितीश राणा त्याला काहीतरी बोलला आणि त्यानंतर बडोनीही प्रत्युत्तर देण्यासाठी सरसावला. यानंतर परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून पंचांनी हस्तक्षेप करून प्रकरण शांत केले.