नाशिक (भ्रमर प्रतिनिधी)- फ्रान्समध्ये झालेल्या जलतरण स्पर्धेत नाशिकच्या तन्वी चव्हाण- देवरे यांनी इंग्लिश खाडीमध्ये यशस्वीरित्या रिले स्पर्धा पार पाडली.
अशा प्रकारची रिले स्पर्धा पार करणाऱ्या नाशिक मधील त्या पहिल्याच महिला जलतरणपटू ठरल्या आहेत. त्याचबरोबर दोन मुलांची आई असलेल्या तन्वी चव्हाण -देवरे या पहिल्याच भारतीय माता ठरल्या आहेत. तन्वी यांच्या टीमने ही जलतरण रिले स्पर्धा दहा तास आणि 58 मिनिटात पार केली.
तन्वी यांची निवड रिले आणि वैयक्तिक या दोन्ही प्रकारात झाली आहे. रिलेमध्ये चार जलतरणपटू यांनी प्रत्येकी 8 किलोमीटर स्विमिंग केले. तन्वीसोबत दोन भारतीय, एक अमेरिकन आणि एक ब्रिटीश जलतरणपटू रिले संघात होते.
तन्वी देवरे यांच्या जलतरणाचा असा आहे इतिहास
इंग्लिश खाडी यशस्वीपणे पार करण्याचा निर्णय तन्वी यांनी वयाच्या 33 व्या वर्षी आणि दोन मुलांची आई असतांना घेतला, हे खूप विशेष आहे.
तन्वी यांना ७ व्या वर्षीपासून स्विमिंगची आवड आहे आणि त्यांनी अनेक पदके जिंकली आहेत. आतापर्यंत शालेय, आणि संघटनेच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके प्राप्त केली आहेत. शिवाय धरमतर्फे गेटवे ऑफ इंडिया (35 किलोमीटर), संक रॉक ते गेटवे ऑफ इंडिया (पाच किलोमीटर) आणि इंडियन नेव्हीच्या नेव्ही डॉक यार्ड मध्ये होणाऱ्या सहा किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धा यशस्वीरित्या जिंकलेल्या आहेत. तसेच मुर्शिदाबाद येथे होणाऱ्या नदीतील 19 किलोमीटर स्पर्धा देखील जिंकलेली आहे.
या अनुभवाच्या जोरावर तन्वी यांनी इंग्लिश चॅनल पात्रता फेरी पार केली. इंग्लिश चॅनल स्पर्धेत प्रवेश निश्चित झाल्यानंतर त्यांनी आपल्या दोन मुलांचा सांभाळ करत मोठ्या जिद्दीने मुख्य कोच बेंगलोर येथील श्रीकांत विश्वनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला. मुख्य कोच यांनी दिलेल्या स्विमिंग प्रोग्राम नुसार त्यांनी काही दिवस बेंगलोर येथे आणि मग नाशिक येथे सेवानिवृत्त साई जलतरण प्रशिक्षक शंकर मालगुंडी यांच्या मार्गदर्शनाखाली रोज सात ते आठ तास स्विमिंगचा सराव सुरू केला तर आठवड्यातून एकदा 11 ते 15 तास स्विमिंगचा सराव केला.
तन्वी यांनी सन 2010 पासून स्विमिंगचा सराव बंद केल्यानंतर लहानपणी पाहिलेले स्वप्न साकार करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. लग्न झाल्यानंतर दोन जुळी मुले आहेत व ते आज सहा वर्षाचे आहेत. अशा परिस्थितीत स्वप्न साकार करण्यासाठी तन्वी यांनी पुन्हा नव्या उमेदीने आणि जिद्दीने 2023 मध्ये सरावास सुरुवात केली. या तिच्या प्रयत्नात तिला सासरच्या आणि माहेरच्या सर्व लोकांची उत्तम साथ मिळाली आणि ते सर्व नेहमीच प्रोत्साहन देण्यासाठी सरावाच्या वेळी उपस्थित असतात.
तन्वी स्विमिंगचा सराव करण्यासाठी नाशिक मनपाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव, त्याचप्रमाणे केन्सिंग्टन क्लब येथील जलतरण तलाव येथे जाते. यासाठी तिला मनपा आयुक्त, जलतरण तलाव येथील कर्मचारी तसेच केन्सिंग्टन क्लब यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.