भारतात होणार्या आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कपची सर्व क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. या स्पर्धेसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ 5 सप्टेंबर रोजी जाहीर केला जाईल. आशिया कप 2023 साठी संघाची घोषणा करताना मुख्य निवडकर्त्याने या 18 पैकी 15 खेळाडूंची निवड केली जाईल असे स्पष्ट केले होते.
टीम इंडियाची अधिकृत घोषणा करण्यापूर्वी वरिष्ठ निवड समितीने 15 खेळाडूंची नावे निश्चित केली आहेत. वर्ल्ड कप संघातून वगळण्यात आलेल्या तीन खेळाडूंमध्ये संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि प्रसिध कृष्णा यांचा समावेश आहे. हे तिन्ही खेळाडू आशिया कप 2023 साठी टीम इंडियाचा भाग आहेत.
ऑस्ट्रेलियासह काही प्रमुख देशांनी 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपसाठी त्यांचा 15 सदस्यीय संघ आधीच जाहीर केला आहे. आता सर्वांच्या नजरा यजमान भारताकडे लागल्या आहेत. यानंतर 27 सप्टेंबरपर्यंत सर्व संघांना त्यांच्या संघात बदल करण्याची संधी मिळेल, मात्र त्यानंतर संघात कोणताही बदल करण्यासाठी त्यांना इव्हेंट टेक्निकल कमिटीची मान्यता घ्यावी लागेल.
हा असू शकतो एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 साठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.