महिला वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ रननी पराभव केला आहे. भारताच्या महिला टीमला पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकता आला आहे. याआधी भारतीय टीम दोन वेळा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली होती, पण दोन्ही वेळा टीमच्या पदरी निराशा आली होती. यंदा मात्र घरच्या मैदानामध्ये भारतीय महिला टीमने ऐतिहासिक कामगिरी करत ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.
भारताने दिलेलं 299 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा 45.3 ओव्हरमध्ये 246 रनवर ऑलआऊट झाला. या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या भारताने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 298 रन केल्या.
पहिल्यांदा महिला संघानं एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकलाय. वर्ल्ड चॅम्पियन झालेल्या भारतीय संघाला ४.४८ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ४० कोटी रुपये) बक्षीस रक्कम मिळेल. ही रक्कम २०२२ मध्ये वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या १.३२ दशलक्ष डॉलर्सपेक्षा २३९ टक्क्यांनी जास्त आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाला किती रक्कम ?
तर वर्ल्ड कपमध्ये उपविजेत्या ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेलाही मोठी रक्कम मिळाली आहे. लॉरा वोल्वार्डच्या नेतृत्वाखालील संघाला २.२४ दशलक्ष डॉलर (अंदाजे २० कोटी रुपये) मिळणार आहेत. ही रक्कम २०२२ च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमधील उपविजेत्या इंग्लंडला मिळालेल्या ६००,००० डॉलरपेक्षा २७३ टक्क्यांनी जास्त आहे.
उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांना समान रक्कम १.१२ दशलक्ष डॉलर (अंदाजे ९.३ कोटी रुपये) मिळाली आहेत. तर गेल्या एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना ३००,००० डॉलर रुपये मिळाले होते. तर पॉइंट टेबलमध्ये पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या श्रीलंका आणि न्यूझीलंड या संघांना समान रक्कम ७००,००० दशलक्ष डॉलर (सुमारे ५.८ कोटी रुपये) देण्यात आले होते.