वर्ल्डकप सुरु असताना क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची कर्णधार मेग लेनिंगला सर्वांना आश्चर्यचकीत करणारा निर्णय घेतला आहे. तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मेग लेनिंगच्या नेतृ्त्वात ऑस्ट्रेलियाने १ वेळेस आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपद पटकावलं आहे.
यासह तिने ४ वेळेस ऑस्ट्रेलियाला महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा खिताब जिंकून दिला आहे. तिने ८ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. क्रिकेट ऑस्ट्रलियाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये निवृत्ती जाहीर केल्यानंतर ती व्यक्त होताना दिसून येत आहे.
तिने म्हटलं की, 'आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणं हा माझ्यासाठी खूप कठीण निर्णय होता. पण मला वाटलं की,हीच योग्य वेळ आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते की, मला १३ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली.' 'मात्र आता मला असं वाटत आहे की, काहीतरी नवीन करण्याची वेळ आहे. मी माझ्या कारकिर्दीत जे काही मिळवलं त्याचा मला अभिमान आहे. माझ्या संघसहकाऱ्यांसोबत घालवलेले प्रत्येक क्षण मला लक्षात राहतील. मी माझे कुटुंब, संघातील खेळाडू, क्रिकेट व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे आभार मानते.'
मेग लेनिंग ही ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची सर्वात यशस्वी कर्णधार आहे. तिने २०१४ मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला टी-२० वर्ल्डकप जिंकून दिला होता. तिने कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाला आतापर्यंत एकुण ५ वेळेस वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद जिंकून दिलं आहे. ज्यात ४ वेळेस टी-२० वर्ल्डकप आणि १ वेळेस वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदाचा समावेश आहे.