क्रिकेटच्या महाकुंभमेळ्याला अवघा दोन आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. भारतात होणाऱ्या विश्वचषकाची जगातील सर्व क्रीडा चाहते वाट पाहत आहेत. पाच ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेच्या बक्षीसाची रक्कम आयसीसीने आज जाहीर केली आहे. स्पर्धेत बक्षीसांवर 10 मिलिअन डॉलरची उधळण होणार आहे. भारतीय रुपयात ही रक्कम 82 कोटी 93 लाख 55 हजार रुपये इतकी होतेय. म्हणजेच, विश्वचषक स्पर्धेत कोट्यवधींची उधळण होणार आहे.
कुणाला किती मिळणार बक्षीस ?
भारतात होणारी विश्वचषक स्पर्धा पाच ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. दहा संघामध्ये रनसंग्राम होणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी विजेता मिळणार आहे. विजेत्या संघाला तब्बल ३३ कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तर उप विजेत्या संघाला १६ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तर सेमीफायनलमध्ये आ्हान संपणाऱ्या दोन्ही संघाला प्रत्येकी सहा कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये आव्हान संपलेल्या संघाला प्रत्येकी ८२ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडिअमवर विश्वचषकाची अंतिम लढत होणार आहे. विजेत्याला संघाला चार मिलिअन डॉलरचे बक्षीस दिले जाणार आहे. तर उपविजेता संघाला दोन मिलिअन डॉलरवर समाधान मानावे लागेल. विजेता संघ ३३ कोटी तर उपविजेता संघ १६ कोटींचे बक्षीस घेईल. साखळी फेरीमध्ये प्रत्येक विजयाला ३३ लाख रुपये दिले जाणार आहेत. त्याशिवाय साखळी फेरीत आव्हान संपणाऱ्या संघाला ८२ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
दहा संघामध्ये रनसंग्राम होणार
भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड हे संघ पात्र ठरले आहेत.