वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 च्या अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने विश्वचषक उंचावला. प्रशिक्षक राहुल द्रविडचं मार्गदर्शन आणि कर्णधार रोहित शर्माची रणनिती एकत्र आल्याने भारताच्या विश्वचषक विजयाचे स्वप्न तब्बल 17 वर्षांनी पूर्ण झालं. या विजयानंतर रोहित शर्माने टी-20 क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली, तर राहुल द्रविडनेही माईलस्टोन गाठल्यामुळे टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदावरुन पायउतार होण्याची हीच ती वेळ असल्याचे सांगत निवृत्ती घेतली.
आता नव्या दमातील टीम इंडियाची धुरा कोणाकडे जाणार यावरुन तर्क वितर्क लावले जात होते. त्यामध्ये, टीम इंडियाचा माजी आक्रमक फलंदाज गौतम गंभीर आघाडीवर होता. अखेर, बीसीसीआयने टीम इंडियाच्या भविष्याबाबत गंभीरतेने विचार करुन गौतम गंभीरची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड केली आहे. त्यामुळे, टीम इंडियात टशन, खुन्नस आणि आरेला कारे.. अशी आक्रमक शैली दाखवलेल्या गौतम गंभीरकडे नव्या दमाच्या टीमला घडवण्याची जबाबदारी आली आहे.
भारतीय संघाने 2011 मध्ये कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात एकदिवसीय विश्वचषक उंचावला. या विजयानंतर महेंद्रसिंह धोनीचे आणि टीम इंडियाचे कौतुक झाले, पण अंतिम सामन्यात 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करणारा गौतम गंभीर दुर्लक्षित राहिला. मात्र, गौतम गंभीर गंभीरची क्रिकेट कारकीर्द त्याच्या उत्कृष्ट, आक्रमक खेळीमुळे जेवढी गाजली, तेवढीच त्याची कारकीर्द मैदानात घेतलेल्या आक्रमक शैलीमुळे, विरोधी संघातील खेळाडूंना दिलेल्या टशन आणि खुन्नसमुळे गाजली.
विरोधी संघाच्याच सोडा पण, भारतीय खेळाडूंसोबतही तो भिडल्याचं मैदानावर पाहायला मिळालं. गौतम गंभीर आणि जलदगती गोलंदाज श्रीसंत हे भर सामन्यात एकमेकांसमोर आले होते. तर, पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीसोबतचा गौतम गंभीरचा वाद चांगलाच गाजला आहे. मैदानात टशन-खुन्नस देणाऱ्या गौतम गंभीरला आता शांत-संयमी बनूनच टीम इंडियाच्या युवा संघाला जगजेत्ता बनविण्यासाठी मेंटोरशीप करायची आहे.
मैदानात आणि मैदानाबाहेरही आक्रमक असलेला गौतम गंभीर आता प्रशिक्षकपदी आल्यानंतर स्वत:च्या शैलीत बदल करतो का हे येणार काळच सांगू शकेल.