भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयमध्ये मोठा फेरबदल झाल्याचं वृत्त समोर येत आहे. माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी हे आता बीसीसीआयचे अध्यक्ष राहिलेले नाहीत. त्यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. बीसीसीआय आता बिन्नी यांच्या जागी नवीन अध्यक्षाचा शोध घेत आहे. नव्या अध्यक्षाचा शोध पूर्ण होईपर्यंत उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याकडे बोर्डाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शुक्ला सध्या कार्यवाहक अध्यक्ष म्हणून कारभार पाहतील. राजीव शुक्ला हे दीर्घ काळापासून बोर्डाशी संलग्न आहेत. त्यांनी बोर्डामध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केलेलं असल्याने त्यांच्या पाठीशी मोठा प्रशासकीय अनुभव आहे. बुधवारी झालेल्या बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत राजीव शुक्ला यांनी कार्यवाहक अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
या महिन्याच्या सुरुवातीला नव्या कायद्यामुळे ड्रीम 11 कंपनी बीसीसीआयबरोबरच्या करारामधून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियाच्या नवीन प्रमुख प्रायोजकावर चर्चा करणे हा बैठकीचा मुख्य अजेंडा होता. 9 सप्टेंबरपासून आशिया चषक स्पर्धा सुरू होत असल्याने, कार्यक्रमापूर्वी नवीन प्रायोजक मिळणे हे एक मोठे आव्हान आहे.