भारतासह जगभरात इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलची चर्चा सुरु आहे. आयपीएल २०२५ मधील आतापर्यंत ३४ सामने खेळले गेले आहेत.
दिल्ली, गुजरात, पंजाब असे संघ सध्या टॉपवर आहेत. मुंबई इंडियन्सने सुरुवातीला फ्लोप शो दाखवला. पण त्यांनीही कमबॅक केले आहे.
मुंबईसह चेन्नई देखील रंगात येत असल्याचे म्हटले जात आहे. आयपीएलची धामधुम सुरु असताना बीसीसीआयने फिक्सिंग विरोधात केलेल्या एका कारवाईची मोठी चर्चा होत आहे.
मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने मुंबई टी-२० लीगमधील संघाचे माजी सह-मालक गुरमीत सिंग भामराह यांच्यावर बंदी घातली आहे.
मुंबई-टी २० लीगच्या २०१९ मधील दुसऱ्या सीझनमध्ये मॅच फिक्सिंगसाठी धवल कुलकर्णी आणि भाविन ठक्कर यांच्याशी संपर्क साधल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. बीसीसीआयचे लोकपाल न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी गुरमीत सिंग यांच्यावर बंदी घातल्याची माहिती समोर आली आहे.
गुरमीत सिंग भामराह जीटी-२० कॅनडा लीगमध्येही सक्रीय होते. ही लीग आता बंद झाली आहे. मुंबई टी-२० लीगमध्ये आधी त्यांचा सहभाग होता. सोबो सुपरसॉनिक्स या संघाचे ते सह-मालक होते.
बीसीसीआयने त्यांच्यावर किती वर्षांची बंदी घातली हे अद्यापही अस्पष्ट आहे. तरीही बीसीसीआयच्या भष्ट्राचार विरोधी संहितेनुसार, भामराह यांच्यावर ५ वर्ष ते आजीवन बंदी घातली जाऊ शकते.
मुंबई टी-२० लीग २०१८ मध्ये खेळली गेली होती. २०१९ मध्ये त्याचा दुसरा सीझन आला होता. करोना महामारीमुळे मुंबई टी-२० लीगचे आयोजन करणे शक्य झाले नाही.
तब्बल चार वर्षांनी म्हणजे २०२५ मध्ये या लीगचा तिसरा सीझन खेळला जाणार आहे. आयपीएलनंतर लगेच ही लीग सुरु होईल. रोहित शर्मा हा मुंबई टी-२० लीगचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे.