आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेतील फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव करत जेतेपद पटकावलं. यानंतर काल बीसीसीआयने टीम इंडियासाठी 131 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. विश्वविजेत्या टीम इंडियाला आयसीसीकडून 27.48 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले गेले. त्यानंतर बीसीसीआयकडून टीम इंडियाला 131 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. आता हे पैसे कुणाला मिळणार ? किती मिळणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे.
बीसीसीआयकडून मिळणारी ही बक्षीस रक्कम खेळाडू, प्रशिक्षक त्यासोबतच इतर कर्मचाऱ्यांमध्ये वाटली जाते. वृत्तानुसार, रकमेतील सर्वात मोठा भाग खेळाडूंना जातो, तर उर्वरित रक्कम प्रशिक्षक कर्मचारी, सहाय्यक कर्मचारी आणि निवडकर्त्यांमध्ये वाटली जाते.
गेल्या वर्षी जेव्हा भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तेव्हा बीसीसीआयने 58 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. जेव्हा भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला तेव्हा टीम इंडियाला 51 कोटींचे बक्षीस मिळाले.
आतापर्यंत, टीम इंडियाने तीन कर्णधारांच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक जिंकला आहे. प्रथम, 2007 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली, नंतर 20२4 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि आता 2026 मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली, टीम इंडियाने 2014 च्या टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला, परंतु श्रीलंकेने तो अंतिम सामना ६ विकेट्सने जिंकला. अशाप्रकारे, भारताने आता तीन टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकल्या आहेत.