वानखेडे स्टेडियमच्या तिकिटांचा काळाबाजार, माजी अंडर-१९ क्रिकेटपटूला अटक
वानखेडे स्टेडियमच्या तिकिटांचा काळाबाजार, माजी अंडर-१९ क्रिकेटपटूला अटक
img
वैष्णवी सांगळे
नुकत्याच भारतात पार पडलेल्या टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील तिकीट काळाबाजाराचे मोठे रॅकेट मुंबई पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या प्रकरणात मुंबईच्या एका माजी २६ वर्षीय क्रिकेटपटूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्याच्या तिकिटांची चढ्या दराने विक्री केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.



अलीकडेच झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताने अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवत तिसऱ्यांदा हा चषक जिंकला. तत्पूर्वी मुंबईतील वानखेडे मैदानावर भारताने इंग्लंडविरोधात निर्णायक विजय मिळवून अंतिम सामन्यात धडक घेतली होती. दरम्यान मुंबईत झालेल्या सामन्याची तिकिटे चढ्या दराने काळ्या बाजारात विकल्याच्या आरोपाखाली मुंबई अंडर-१९ संघाचा माजी क्रिकेटपटू बलवंत सिंग स्वरूप सिंग सोढा (वय २६) याला अटक करण्यात आली आहे. डिबी मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी पोलिसांनी ही सातवी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, सोढाचा फोन जप्त करण्यात आला असून त्याची तपासणी सुरू आहे. तिकिटे कुठून मिळवली आणि या रॅकेटशी अजूनही कुणी संबंधित आहे का? याचा छडा लावला जात आहे.पोलिसांनी या प्रकरणात २४ तिकिटे जप्त केली असून ती मुंबई क्रिकेट असोसिएशनला परत देण्यात आली आहेत. ही तिकिटे कुणाला देण्यात आली होती, याची माहिती मागवली जात आहे.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोढाने प्रत्येकी २५ हजार रुपयांना दोन तिकिटे विकली. पण ही तिकिटे त्याने कुठून मिळवली, याची माहिती समोर येऊ शकलेली नाही. या तपासाशी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही सोढाचा कॉल रेकॉर्ड तपासत असून आणखी माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, याच विश्वचषकात भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. मात्र, या विजयाच्या जल्लोषात आता तिकीट काळाबाजारासारख्या गंभीर प्रकरणाने गालबोट लावले आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही बड्या व्यक्तींचा किंवा क्रिकेटशी संबंधित लोकांचा समावेश आहे का, याचा तांत्रिक विश्लेषण (द्वारे पोलीस शोध घेत आहेत. येत्या काळात या प्रकरणात आणखी काही अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group