भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी सिद्धूंनी सुचवला 'हा' खेळाडू
भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी सिद्धूंनी सुचवला 'हा' खेळाडू
img
दैनिक भ्रमर
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताचा क्रिकेट संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने मागील वर्षी वन डे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारताने जागा मिळवली. या मोठ्या स्पर्धांच्या अंतिम सामन्यांमध्ये रोहितसेनेला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला.

मागील काही काळ भारताच्या ट्वेंटी-२० संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे होती. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिककडे संघाचे कर्णधारपद होते. पण, आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया असणार आहे. रोहितनंतर भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद कोण सांभाळणार याबद्दल बोलताना नवज्योतसिंग सिद्धू यांनी ३० वर्षीय गोलंदाजाचे नाव सुचवले आहे. जसप्रीत बुमराह भारताच्या कसोटी संघाचा पुढचा कर्णधार असू शकतो असे सिद्धूंनी सांगितले.

सिद्धूंनी सुचवला पर्याय

सिद्धू म्हणाले की, रेड बॉल क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह हा चांगला पर्याय आहे. तो एक पडद्यामागील हिरोंपैकी एक आहे. आपण विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यांच्याबद्दल नेहमी बोलत असतो. पण, बुमराह ज्या पद्धतीने दुखापतीतून सावरून कामगिरी करत आहे ते कौतुकास्पद आहे. तो आताच्या घडीला कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. मला वाटते की, तो कर्णधारपदासाठी देखील नक्कीच पात्र आहे. सिद्धू 'इंडिया टुडे' या वृत्तसंस्थेशी बोलत होते.

दरम्यान, २०२२ मध्ये इंग्लंडविरूद्धच्या एका कसोटी सामन्यात बुमराहने टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळले आहे. आयर्लंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत देखील त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले. ३० वर्षीय बुमराह आताच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील सर्वात घातक गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने ३६ कसोटी सामन्यांमध्ये १५९ बळी घेतले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group