आनंदाची बातमी...महाराष्ट् प्रीमियर लीग मध्ये नाशिकचा सत्यजित बच्छाव ठरला सर्वोत्कृष्ट गोलंदाज
आनंदाची बातमी...महाराष्ट् प्रीमियर लीग मध्ये नाशिकचा सत्यजित बच्छाव ठरला सर्वोत्कृष्ट गोलंदाज
img
Jayshri Rajesh
नाशिकचा डावखुरा फिरकीपटू व अष्टपैलू खेळाडू , भरवशाचा नामवंत रणजीपटू महाराष्ट्राचा आघाडीचा गोलंदाज सत्यजित बच्छाव , महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक बळी घेत उत्कृष्ठ गोलंदाज सन्मान पर्पल कॅप चा मानकरी ठरला आहे. सत्यजितने एकूण २५ बळी घेत वसंत रांजणे पर्पल कॅप चा बहुमान मिळवला.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुणे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धा पार पडल्या. कर्णधार आझिम काझी च्या नेतृत्वात रत्नागिरी जेट्स या संघातर्फे खेळत अंतिम सामन्यात सत्यजित बच्छाव ने विजयी कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कार पटकवत महाराष्ट्र प्रीमियर लीग चषक जिंकला. अंतिम सामन्यात सत्यजितने ४ षटकांत ३१ धावांत ४ बळी घेतले व ईगल नाशिक टायटन्स वर विजय मिळवला.

बेस्ट - क्रिकेटपटू चे पारितोषिक

सत्यजित बच्छावला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन - एम सी ए- चे २०२२ वर्षा साठीचे सर्वोत्कृष्ट - बेस्ट - क्रिकेटपटू चे पारितोषिक मिळाले आहे . २०१८-१९ या  वर्षी सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेत सत्यजित बच्छावने  सर्वाधिक बळी मिळवत महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत नेण्यासाठी मोठा हातभार लावला होता व महाराष्ट्राने या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सत्यजित हा महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज झालेला आहे.  

सी एस के संघाच्या शिबिरासाठी निवड

या स्पर्धेतूनच आयपीएल स्पर्धेत खेळण्याची संधी उपलब्ध होते. मागील सहा-सात वर्षांपासून मुश्ताक अली स्पर्धेत सत्यजित सातत्याने उत्कृष्ठ कामगिरी करत असल्यानेच  गेली काही वर्षे आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत त्याचा समावेश होत आहे. आय पी एल लिलावात, २० लाख इतकी कमीतकमी बोली किंमत मिळणार्‍या खेळाडुंच्या , आतापर्यंत प्रतिनिधित्व न केलेल्या गटात  त्याचा समावेश होता. त्याबरोबरच आय पी एल २०२२ च्या हंगामासाठी महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स - सी एस के - तर्फे संघाच्या शिबिरासाठी निवड झाली होती. 

सत्यजितला चेन्नई सुपर किंग्सने गोलंदाजी  विशेषज्ञ म्हणुन संघाच्या शिबिरात खास निमंत्रित केले होते. गेल्या २०२२ च्या हंगामात मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेच्या काही सामन्यांत सत्यजितने  महाराष्ट्राचे कर्णधारपद देखील भूषवले होते. जानेवारी २०१६ तील सर्विसेस विरुद्ध कटक येथे सुरू झालेल्या ,आतापर्यंतच्या टी-ट्वेंटी च्या कारकिर्दीत सत्यजितने ४६  सामन्यातील ४५  डावात एकूण ६२ बळी घेतले असून १८ धावात ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

४८ संघांमध्ये सर्वाधिक गुण

मागच्या २०२२-२३ च्या हंगामात सत्यजितच्या नेतृत्वात त्याच्या अष्टपैलु खेळामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत (एम सी ए  सिनियर इन्विटेशन लीग), नाशिकने विजेतेपद पटकावले होते. नाशिक जिल्हा संघाने साखळी व अव्वल साखळीत - लीग व सुपर लीग - सामन्यांत जोरदार कामगिरी करत स्पर्धेत सहभागी महराष्ट्राचे २१  जिल्हे व २७ नामवंत क्लबज्  अशा एकूण ४८ संघांमध्ये सर्वाधिक गुण मिळवत प्रथम स्थान पटकावले होते. 

 कर्णधार सत्यजित बच्छावने स्पर्धेत उत्कृष्ट नेतृत्वाबरोबरच अष्टपैलू चमक दाखवत फलंदाजीत २ शतके व ४  अर्धशतके झळकवत १० डावात ५४७ धावा केल्या तर  गोलंदाजीत १० सामन्यातील १६ डावात ४९ बळी  घेतले व अर्थातच अंतिम लढतीत नाबाद १५२ धावांची अविस्मरणीय खेळी केली.

`` सत्यजित खूप मनःपूर्वक अभिनंदन.  नाशिक क्रिकेट साठी अतिशय महत्वाचा सन्मान मिळवून तू हे सिद्ध केले की तू महाराष्ट्राचा उत्कृष्ट गोलंदाज आहेस. Keep It Up! ``  या शब्दांत नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व सचिव समीर रकटे यांनी सत्यजित बच्छावचे कौतुक केले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group