नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : बहरीन येथे झालेल्या तिसऱ्या युथ गेम्स अॅथलिट स्पर्धेत २०० मीटर धावणे आणि ४ बाय १०० मीटर धावणे रिले स्पर्धेत नाशिकची धावपटू भूमिका नेहते हिने भारताला पदके मिळवून दिली.

रविवारी रात्री झालेल्या या स्पर्धेमध्ये प्रथम २०० मीटर धावतांना भूमिका नेहते ही तृतीय स्थानावर राहिली. तिने ब्रॉन्झ पदकाची कमाई केली. त्यानंतर काही वेळातच झालेल्या ४ बाय १०० मीटर धावणे रिले स्पर्धेत द्वितीय स्थान प्राप्त करत देशाला रौप्यपदकाची कमाई करून दिली.
याआधी भुवनेश्वर येथे ४० व्या कनिष्ठ गटाच्या मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भूमिका नेहते हीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी २०० मीटर धावणे या प्रकारासाठी आवश्यक असलेल्या वेळेपेक्षा कमी म्हणजे २४.४२ सेकंद या वेळेत हे अंतर पूर्ण करून भारतीय संघामध्ये आपली निवड पक्की केली होती.
पाटणा येथे आयोजित खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेमध्येही भूमिकाने २०० मीटर धावणे प्रकारात पहिला क्रमांक मिळविला होता. या सुवर्ण कामगिरीमुळे भूमिकाची भारतीय संघामध्ये निवड करण्यात आली होती.
शॉर्ट डिस्टन्स म्हणजे कमी अंतराच्या २०० मीटर प्रकारात भारताच्या संघामध्ये निवड होणारी भूमिका नेहते ही पहिली खेळाडू ठरली आहे. भूमिका नेहते ही गेल्या पाच वर्षांपासून एन. आय. एस. प्रशिक्षक सिद्धार्थ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी, नाशिक येथे नियमित सराव करत आहे. भूमिका नेहते हिच्याबरोबर सिद्धार्थ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार्या अनेक खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे.
भूमिका नेहतेच्या या उत्तम कामगिरीची दखल घेऊन नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंके, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे, सचिव सुनील तावरगिरी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.