नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- पोलीस असल्याचे भासवून अज्ञात इसमाने शेताजवळ उभ्या असलेल्या वृद्धाकडील सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हातोहात लंपास केल्याची घटना पंचवटीत घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अशोक शंकर जेजुरकर (रा. जेजुरकर मळा, छत्रपती संभाजीनगर रोड, पंचवटी) हे काल (दि. 18) दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास त्यांच्या शेताजवळ उभे होते. त्यावेळी जयशंकर फेस्टिव्हल लॉन्सच्या रस्त्यालगत उभ्या असलेल्या मोटारसायकलीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी पोलीस असल्याचे भासविले.
त्यानंतर जेजुरकर यांच्या हातातील 75 हजार रुपये किमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 75 हजार रुपये किमतीची 15 ग्रॅम वजनाची पुष्कराज खडा असलेली सोन्याची अंगठी व दीड लाख रुपये वजनाची 30 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असा एकूण 3 लाख रुपये किमतीचा ऐवज फिर्यादीस काढण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक करून निघून गेले. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे करीत आहेत.