नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : एकतर्फी प्रेमातून 24 वर्षीय युवकाने युवतीचा विनयभंग केल्याची घटना पंचवटीतील एका कॉलेजच्या पार्किंगमध्ये घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी युवती कॉलेज सुटल्यावर घरी जाण्यासाठी कॉलेजच्या पार्किंगमध्ये गाडीजवळ गेली. यावेळी ओळखीचा असलेला राहुल विष्णू काशीद (वय 24, रा. दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक) हा तिच्याजवळ येऊन थांबला.
तो तिला म्हणाला, “तू गेल्या तीन महिन्यांपासून माझ्यासोबत का बोलत नाहीस? तू इन्स्टाग्रामवर कोणाला लाईक आणि फॉलो करते?” असे म्हणत त्याने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात करून तिला शिवीगाळ केली. नंतर त्याने फिर्यादीच्या मैत्रिणीसमोर पीडितेचा उजवा हात पिरगाळून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. यावरच न थांबता त्याने तिच्या गालावर दोन चापट मारीत “मला तू आवडतेस. मी तुला दुसर्याची होऊ देणार नाही. असे झाले, तर वाईट परिणाम होतील,” असा दम त्याने दिला.
15 मेपासून ती राहुल काशीद याच्यासोबत बोलत नसल्याने तो तिचा वारंवार पाठलाग करून तिला त्रास देत होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून युवतीने त्याच्याविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत