समृद्धी महामार्ग गेल्या अनेक महिन्यांपासून अपघाताच्या घटनांनी चर्चेत आहे. सातत्याने या महामार्गावर होणारे अपघात चिंतेची आणि संसोधनाची बाब बनला आहे. त्यातच आता समृद्धी महामार्ग अंमली पदार्थांच्या तस्करीचा नवा अड्डा देखील बनू पाहत आहे. समृद्धी महामार्गाने नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दोन चार चाकी वाहनांमध्ये गांजाचा मोठा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांनी ही दोन वाहने जप्त केली असून त्यातून तब्बल 121 किलो गांजा जप्त केला आहे.
समृद्धी महामार्गावरुन मोठ्या प्रमाणावर तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे चार पथके सिन्नर येथील समृद्धी महामार्गावर गस्त घालत असताना दोन चार चाकी वाहनात गांजा असल्याची पोलीस सुत्रांची माहिती मिळाली. ग्रामीण पोलिसांच्या पथकाने समृद्धी महामार्गावर सिनेस्टाईल पाठलाग करून चार चाकी वाहनातून तब्बल 121 किलो गांजासह ही दोन्ही वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत तीन गांजा तस्कर पोलिसांच्या ताब्यात असून त्यातील एक फरार झाला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांचे पथक अद्यापही त्याच्या मागावर असून तिघांना सिताफीने अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल 36 लाख 29 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी भारत चव्हाण, तुषार काळे, संदीप भालेराव या तिघांना अटक केली असून सुनील अनार्थे हा आरोपी फरार आहे. आरोपींवर नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यात तब्बल 11 गंभीर गुन्हे दाखल असून तो कुख्यात टिप्पर गँगचा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ग्रामीण पोलीस दलातील एक अधिकारी आणि एक अंमलदार या कारवाईच्या दरम्यान किरकोळ जखमी झाले आहेत.