नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या व्यक्तीने केलेले चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली.
याबाबत पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की इन्स्टाग्राम अॅपवरून त्यांची आरोपी ज्ञानेश्वर पंढरीनाथ कुमावत याच्याशी ओळख झाली. चॅटिंगच्या माध्यमातून त्याने फिर्यादी महिलेशी जवळीक वाढवून मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. दि. 7 नोव्हेंबर रोजी आरोपी ज्ञानेश्वर कुमावतने पीडित महिलेच्या घरात प्रवेश करून त्यांच्या मुलीला जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर अत्याचार केले.
घडलेली घटना कोणाला सांगितल्यास पीडितेने आरोपीच्या सोबत केलेले चॅटिंग व त्यांचे फोटो पीडितेच्या पतीला व नातेवाईकांना व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात कुमावत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहेत.