नाशिक - सातपूर परिसरामध्ये असलेल्या कॉलनी येथे झाड तोडण्यासाठी आणलेल्या पेट्रोलच्या कॅनला धक्का लागल्यामुळे सांडलेल्या पेट्रोल हे अग्नीच्या सान्निध्यात आल्याने आग लागून 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. तातडीने या ठिकाणी महानगरपालिकेचे अग्निशमन दलाच्या बंबाने जाऊन ही आग आटोक्यात आणली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी 11- 11.30 वाजेच्या सुमारास सातपूर परिसरात झाड तोडण्याचे काम सुरू होते. झाड तोडण्यासाठी आलेल्या मजुरांनी कटर मशीनसाठी आवश्यक असणारे पेट्रोल हे एका कॅनमध्ये आणलेले होते. ही कॅन बाजूला ठेवून झाड तोडण्याचे काम सुरू असताना या परिसरातून एक वाहन गेले आणि त्या वाहनाचा धक्का या कॅनला लागला. त्यामुळे असलेले पेट्रोल सांडले.
त्यावेळी तिथेच एक जण बिडी ओढत असल्याने तेथे आगीचा भडका उडाला. या ठिकाणी झाड तोडण्याचे काम करणाऱ्या सह इतर काही जण भाजले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने सातपूर अग्निशमन केंद्र मधून बंब या ठिकाणी दाखल झाला आणि आग आटोक्यात आणली. सर्व जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
जखमी झालेल्यांची नावे
सोनू गाडेकर, लताबाई दोबाडे, कैलास दोबाडे, सुरेश दोबाडे, दुर्गा दोबाडे