नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- दोन वेगवेगळ्या नावांनी असलेल्या प्रोफाईलशी चॅटिंगद्वारे ऑनलाईन पार्टटाईम जॉबचे आमिष दाखवून दोन जणांची सुमारे 23 लाख 13 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी व साक्षीदार हे नाशिक येथे राहतात. त्यांना टेलिग्राम प्रोफाईलद्वारे अज्ञात इसमाने पार्टटाईम जॉबचे मॅसेज पाठवले. मॅसेजवरील लिंक क्लिक केल्यावर टेलिग्रामवर आलेल्या शुभम अॅडमिन व अन्य एका नावाने असलेल्या प्रोफाईलशी चॅटिंगद्वारे ऑनलाईन पार्टटाईम जॉबचे आमिष दाखवले, तसेच वेळोवेळी दिलेल्या टास्कची ऑर्डर पूर्ण करण्याकरिता एकूण 15 लाख 2 हजार 344 रुपये नमूद विविध युपीआयच्या खात्यावर वर्ग करण्यास भाग पाडून फसवणूक केली. तसेच अन्य एक साक्षीदार याचीसुद्धा 5 ऑक्टोबर 2025 रोजी इंड्सइंड बँक खाते, आयडीएफसी बँक खाते या दोन्ही बँकेत एकूण 8 लाख 11 हजार 367 रुपये ऑनलाईन भरण्यास भाग पाडले.
फिर्यादीच्या साक्षीदारालाही अज्ञात आरोपींनी ऑनलाईन पार्टटाईम जॉबचे आमिष दाखवले. दोघा जणांची मिळून अज्ञात इसमाने 23 लाख 13 हजार 711 रुपये बँक खात्यात भरण्यास सांगून आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 11 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन पद्धतीने व इंटरनेटद्वारे घडला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीची रक्कम वर्ग झालेल्या बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे करीत आहेत.