Nashik : विवाहबाह्य संबंधातुन पतीला होता मुलगा; पीडितेने
Nashik : विवाहबाह्य संबंधातुन पतीला होता मुलगा; पीडितेने "अशी" केली पतीच्या कृत्याची पोलखोल
img
दैनिक भ्रमर

नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- पतीला विवाहबाह्य संबंधाबाबत विचारणा केली असता सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केल्याची घटना कार्बन नाका परिसरात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. २८ मे २०१० रोजी पीडित विवाहितेचा विवाह श्रमिकनगर येथील एका इसमाशी झाला होता. लग्न झाल्यानंतरदेखील तो तिच्याकडे राहत नसल्याने तिने याबाबत सासरच्या लोकांना सांगितले. त्यावेळी सासूने मुलगा लाजाळू असल्याचे सांगत "सर्व व्यवस्थित होईल,” असे आश्वासन दिले. दरम्यान, पीडितेचा पती रात्री कोणाशी तरी तासन्तास मोबाईलवर गप्पा मारीत असल्याचे पाहून तिने एकदा पतीचा मोबाईल तपासला असता तो एका मुलीशी बोलत असल्याचे तिला समजले. याबाबत तिने त्याला विचारणा केली असता "आम्ही एकाच ठिकाणी कामाला असून, आमची हंसीमजाक चालू असते,” असे सांगून तिची समजूत काढली.

सन २०१२ मध्ये तिला मुलगी झाल्याने पती व सासरच्यांनी "आम्हाला मुलगा हवा होता,” असे सांगत तिला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तिला शिवीगाळ व मारहाण करीत मुलीला सांभाळण्यासाठी वडिलांकडून पैसे घेऊन येण्याची मागणी करू लागले. सन २०१५ मध्ये पीडितेने मुलास जन्म दिला. त्यावेळेपासून दोन्ही मुलांना तीच सांभाळत होती. तिचा पती खर्चासाठी पैसे देत नसल्याने तिचे आईवडील सर्व खर्च करीत होते. एके दिवशी पीडितेने पतीला एका मुलीशी व्हिडिओ कॉलवर बोलताना पाहिले.

याचा जाब विचारला असता "तू माझ्यावर संशय घेतेस का,” असे म्हणत तिला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सन २०१७ मध्ये पीडितेच्या पतीच्या मोबाईलवर एका शाळेचा फोन आला व "तुमच्या मुलाला पिकनिकला जायचे आहे का?” अशी विचारणा केली. त्यावेळी राँग नंबर असल्याचे सांगत तिने फोन ठेवून दिला. यावेळी तिची शंका आणखी वाढल्याने संबंधित शाळेत जाऊन तिने माहिती घेतली. त्यावेळी तिला समजले, की तिच्या पतीचे दुसर्‍या महिलेसोबत संबंध असून, त्या शाळेतील मुलगा त्या दोघांचा आहे. आपली फसवणूक झाल्याचे समजताच पीडितेने आपल्या मामांना बोलावून सर्व हकीगत सांगितली.

पतीला मामांनी जाब विचारला असता तो जेथे काम करतो, तेथील एका महिलेशी त्याचे संबंध असून, माझी चूक झाली, मला माफ करा, अशी तो विनवणी करू लागला. "तुमचे एका महिलेशी संबंध असताना माझे आयुष्य का खराब केले? मला का फसवले?” असे विचारले असता त्याने दोन्ही मुलांना स्वत:जवळ ठेवत तिला घरातून बाहेर काढून दिले. "तुला जर दोन्ही मुले हवी असतील, तर आमच्याकडून अन्नवस्त्राची मागणी करणार नाही व आपण वेगळे होत आहोत,” असे तिच्याकडून जबरदस्तीने लिहून घेत तिच्या सह्या घेऊन नोटरी केली; परंतु त्यानंतरदेखील दीड वर्ष तिच्या सासरच्यांनी तिला मुलांना भेटू दिले नाही. सन २०१९ मध्ये तिच्या नातेवाईकांनी समजूत काढत तिला पुन्हा सासरी नांदायला पाठविले. "तुला आम्ही पैसे देणार नाही.

तू तुझी नोकरी कर आणि खर्च भागव,” असे तिला सांगितले. दरम्यान, पीडितेची नणंद ही पीडितेच्या सासू-सासर्‍यांना भडकावून देत होती. त्यावेळी पतीने "मला दुसर्‍या बायकोला नांदवायचे आहे. तू काही कामाची नाही. तुला काही जमत नाही. तू परत कशाला आली?” असे म्हणून तिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. हा सर्व त्रास ती सहन करीत होती. सन २०२४ च्या दिवाळीदरम्यान सासू-सासर्‍यांनी व सासरच्या इतर लोकांनी पीडितेच्या नवर्‍याच्या दुसर्‍या बायकोला नांदवायला आणायचे आहे, असे तिला सांगितले. तिने विरोध केला असता सासू, सासरे व पतीने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिच्या अंगावरील स्त्रीधन काढून घेत "तू परत आमच्या दारात येऊ नकोस. आम्हाला फारकत दे,” असे म्हणून तिला घराबाहेर काढले.

हा सर्व त्रास असह्य झाल्याने तिने महिला सुक्षा विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सासरच्या लोकांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group